गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील कौठा येथील राजे संभाजी माध्यमिक विद्यालयात नुकताच आनंद मेळावा मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला.या मेळाव्याचे उदघाटन कौठा गावचे सरपंच प्रमोद गजभार यांच्या हस्ते पार पडले.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कौठा सोसायटीचे चेअरमन रावसाहेब शेळके हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून तंटामुक्तीचे अध्यक्ष रावसाहेब काळे तसेच उपसरपंच कडुभाऊ मोहिते ,माजी सरपंच नामदेव तात्या शेळके , मच्छिन्द्र तात्या डाके,अजित साळुंके, प्रदीप वाकचौरे सह मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना शालेय ज्ञानाबरोबरच त्यांचा सर्वांगीण बौद्धिक विकास होऊन त्यांना व्यवहार कौशल्य हस्तगत व्हावे या हेतूने दरवर्षी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. आजच्या स्पर्धेच्या युगात ग्रामीण विद्यार्थी मागे राहता कामा नये त्याच बरोबर भविष्यामध्ये एक सज्ञान व कुशल नागरिक तयार व्हावा हा यासाठी पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यवहार कौशल्य आत्मसात व्हायला हवे. तरच तो आगामी काळात तग धरू शकेल व भविष्यात आपले लक्ष्य गाठू शकेल. म्हणून दरवर्षी विद्यालयात आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात येऊन विद्यार्थी त्यांच्या शेतातील भाजीपाला, फळ फळावळे, विविध खाद्यपादार्थांचे स्टॉल लावतात.

यामध्ये विशेष लक्ष्य वेधून घेणारी खाऊगल्ली विशेष भाव खाऊन जाते. कारण यामध्ये चहा पासून भजी, वडा पाव, पॅटिस, गुलाबजामून, भेळ, फुटाणे – शेंगदाणे, सोयाबीन चिल्ली, फिंगर चिप्स इ. अनेक प्रकारचे विविध स्टॉल सज्ज होते. खाऊगल्ली मध्ये तर फिंगर चिप्स अन सोयाबीन चिल्ली साठी तर शेवटपर्यंत रांगा बघायला मिळत होत्या.या आनंद मेळाव्यात कौठा व परिसरातील ग्रामस्थांनीही भरभरून प्रतिसाद देत खरेदी केली. त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये उत्साह ओसंडून वहात होता.या मेळाव्यामध्ये एकंदरीत ३६,०००- रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक उध्दवराव सोनवणे यांनी सांगितले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.