नेवासा – गृहनिर्माण आवारात बियर किंवा मद्यविक्रीचे दुकान सुरू करण्यासाठी आता संबंधित सोसायटीकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत केली. सोसायटीच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय नवीन बियर शॉपी किंवा दारु दुकान सुरु करता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच महापालिका प्रभागातील दारू दुकान बंद करण्याबाबतच्या प्रस्तावावर एकूण मतदानापैकी ७५ टक्के मतदान ज्या बाजूने होईल त्या बाजूने निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बियर आणि दारु दुकानांना परवानगी सोसायट्यांच्या दिली जात असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा मुद्दा भाजप आमदार महेश लांडगे आणि राहूल कुल यांनी आज लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला होता.

यावेळी झालेल्या चर्चेत सहभागी होताना भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दारू दुकान बंद करण्यासाठीच्या मतदान प्रक्रियेत एकूण मतदानाच्या ७५ टक्केचा निकष निश्चित करण्याची मागणी केली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वरूण सरदेसाई यांनी या मागणीला पाठिंबा दिला. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना पवार म्हणाले, राज्यात दारुविक्री वाढावी अशी राज्य सरकारची भूमिका नाही. दारुबंदीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. राज्यात १९७२ पासून दारू दुकानांचे नवे परवाने दिले जात नाहीत. सध्या केवळ अस्तित्वात असलेल्या परवान्यांच्या आधारे दुकान्यांच्या स्थलांतरास परवानगी दिली जाते. यापुढे स्थलांतरित परवान्याच्या आधारे नव्याने दारू किंवा बियर शॉपी सुरू करण्यापूर्वी ज्या सोसायटीच्या आवारात दुकान सुरू होणार असेल त्या सोसायटीचे ना-हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात येणार आहे.

दरम्यान,स्थानिकांचा विरोध असेल तर मतदानाद्वारे दारु दुकाने बंद करण्याचा कायदा आहे. त्यात अधिक स्पष्टता येण्यासाठी दारु दुकान सुरु किंवा बंद करण्यासाठी महापालिका प्रभागात झालेल्या एकूण मतदानापैकी ७५ टक्के मतदान हे ज्या बाजूने होईल, त्यानुसार निर्णय होईल. राज्यात दारुविक्रीला प्रोत्साहन न देता अवैध दारुविक्री रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असेही पवार यांनी सांगितले. दारुमुळे
राज्याची कायदा-सुव्यवस्था बिघडेल असा कोणताही प्रकार सहन केला जाणार नाही. यासंदर्भत लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या प्रत्येक सूचनेचा सकारात्मक विचार केला जाईल, असेही अजित पवार म्हणाले.

देशातील ज्या राज्यात दारूबंदी लागू करण्यात आली तिथे शेजारच्या राज्यातून येर्णाया अवैध दारूने घातलेला धुमाकुळ आपल्या समोर आहे. मागच्या काळात राज्य सरकारने दारूवरील कर वाढविले तेव्हा दिल्लीतून विमानाने स्वस्त दारू आणण्याचे प्रकार वाढले होते. विमानतळावरील ड्युटी फ्री शाँपमधूनही खरेदी वाढली. राज्यांत तर काही खासदार आणि आमदार निवडून आल्यास दारूबंदी हटविण्याचे आश्वासन देऊन निवडून आहेत, याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.