रांजणगाव –नेवासा तालुक्यातील रांजणगाव येथील अमरधाम मध्ये कुठल्याच प्रकारची सोय नसल्याने गावातील नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की रांजणगावात दोन वर्षांपूर्वी 25 लाख रुपये खर्चून अमरधाम बांधण्यात आलेले आहे. सदर अमरधाम हे रांजणगाव शहापूर रोडवरील हायस्कूलच्या पाठीमागे आहे. या अमरधाम मध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात गवत, काटेरी झुडपे , बारीक सराटे, बांधकामासाठी आणलेले दगड, मुरमाचे मोठाले ढिग पडलेले आहेत. शवदाहिनीच्या शेड जवळ बाजूला मोठमोठे खड्ड्याचे साम्राज्य आहे. अंत्यविधीसाठी आत जाण्याकरिता रस्त्यापासूनच काटेरी सराटयाचा सामना करावा लागतो. पायात चप्पल असून देखील आपण अमरधाम परिसरामध्ये चालू शकत नाही फिरू शकत नाही हि इथली वास्तव अवस्था आहे. ज्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले आहेत त्या ठिकाणी मोठमोठे गवत वाळून मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली आहेत.
मोठ्या प्रमाणात खर्च करून या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले होते आणि त्यासाठी ठिबक सिंचन व्यवस्था ही करण्यात आली होती परंतु सदर ठिबक सिंचन ही बंद पडली असून सर्व लावलेले रोपे वाळून गेले आहेत. काल रात्री गावातील सुसे परिवारातील महिलेचा अंत्यविधी असताना गावातील नागरिकांना व सुसे कुटुंबियांना अतिशय मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. सायंकाळी आठ वाजता अंत्यविधी झाल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अंधार पसरलेला होता. पाण्याची कुठली सोय नव्हती त्या ठिकाणी बांधण्यात आलेली टाकी केवळ शोभेची वस्तू असल्याचे दिसत आहे. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागरिकांना बसण्यासाठी तिथे कुठल्याही प्रकारची स्वच्छ जागा नाही पूर्ण अख्खा परिसर हा गवताने काटेरी झुडपाने वेढलेला असल्यामुळे नागरिकांना व नातेवाईक मंडळींना अक्षरशः बाहेर रस्त्यावर बसवावे लागले. ठराविक लोकांनीच आत जाऊन कसाबसा अंत्यविधी उरकला.
यामुळे बाहेरून आलेल्या नातेवाईकांनी अक्षरशः संताप व्यक्त करत ग्रामपंचायतीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. तसेच गावातील नागरिकांनी सुद्धा याविषयी संताप व्यक्त करून गावातील सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत नेमके करता तरी काय ?असा सवाल उपस्थित केला. अमरधामातील या गैरसोयीमुळे संपूर्ण गावात ग्रामपंचायत कारभाराबद्दल तीव्र नाराजी पसरली असून गावातील नागरिक ज्ञानेश्वर रोडगे, बाळासाहेब गाडेकर, बाबासाहेब पेहेरे यांनी लवकरात लवकर सदर परिसर स्वच्छ करून सर्व सुविधांचा पुरवठा त्या ठिकाणी करण्याची मागणी केली आहे . येत्या आठ दिवसात या ठिकाणी सुविधांचा असाच अभाव राहिल्यास गावातील नागरी तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.